Friday, 22 May 2020

महर्षी धोंडो केशव कर्वे - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

महर्षी धोंडो केशव कर्वे


टोपणनाव: अण्णासाहेब
जन्म: १८ एप्रिल १८५८, शेरवली-मुरूड (कोकण)
मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२, हिंगणे आश्रम (पुणे)
चळवळ: स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा
पुरस्कार: भारतरत्‍न
प्रमुख स्मारके: हिंगणे पुणे
वडील: केशव बापूराव कर्वे
आई: लक्ष्मीबाई केशव कर्वे
पत्नी: राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे
अपत्ये: रघुनाथ ,भास्कर , दिनकर



रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. 
इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.

लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले.

इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते.

अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. 

 इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. 

इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले.

पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.

इ.स. १८९६ मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला.

या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. 

आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. 


स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. 

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' निर्माण झाली. तिचेच नाव पुढे '`महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' (थोडक्यात, कर्वे शिक्षण संस्था) असे झाले. 

१९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.

जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली.

पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे झाले.

अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.

कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.

मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले.

१९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला.

३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली.

धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.

आज २०२० सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर वसंत कानेटकर यांनी 'हिमालयाची सावली' नावाचे नाटक लिहिले आहे.



No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.