Thursday, 21 May 2020

गोपाळ हरी देशमुख - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

गोपाळ हरी देशमुख


जन्म : १८ फेब्रुवारी ,१८२३
मृत्यू :- ९ ऑक्टोबर ,१८९२.
जन्मस्थान :- पुणे
टोपणनाव :- लोकहितवादी , रावबहाद्दूर
वडिलांचे नाव :- हरिपंत देशमुख

गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते.

गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.



इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले.

’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२ पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.

लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही.लोकांनी ज्ञानी व्हाव आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात.इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादीना वाटायचे.

श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली.

हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे.

रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२ मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले.

पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८ मध्ये झाले.

इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२ मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’.

याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.

इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात.

 या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.

 धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाशइंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला.

लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले.

लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ.

लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.

मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे.

मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्‍री ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली.

सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता.

इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले.
इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले.

गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी ऊर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले.

अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना, हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य, गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना, गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन, गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत,
पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग इत्यादी त्यांचे समाजकार्य उल्लेखनीय आहे.

ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७ मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.

१८८१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.


No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.