Monday, 18 May 2020

अँडीज पर्वत

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

अँडीज पर्वत

दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळची, त्याला समांतर असलेली, उंचीला फक्त हिमालयाच्याच खालोखाल आणि जगातील सर्वांत लांब—केप हॉर्न ते पनामापर्यंत सु. ७,२४० किमी. किंवा टिएरा डेल फ्यूगो ते कॅरिबियनपर्यंत सु. ६,४४० किमी.– पर्वतश्रेणी. केचुआ इंडियनांच्या ‘पूर्व’ या अर्थाच्या ‘अँटी’ किंवा ‘तांबे’ या अर्थाच्या ‘अँटा’ या शब्दावरून कदाचित ‘अँडीज’ हे नाव पडले असावे. याच्या पूर्वेस ओरिनोकोचे लानोज, ॲमेझॉनचे खोरे, पूर्व बोलिव्हिया व पाराना यांची मैदाने आणि पॅटागोनियाचे पठार आहे. पश्चिमेस अँडीज व पॅसिफिक महासागर यांच्या दरम्यान अगदी चिंचोळी किनारपट्टी असून, काही ठिकाणी अँडीजचे फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत, तर काही ठिकाणी किनारी पर्वतरांगा आहेत. चिलीमधील किनारी रांगा सलग असल्यामुळे त्या व अँडीज यांच्या दरम्यान सांरचनिक दरी आहे. सबंध दक्षिण अमेरिका खंडावर या पर्वतश्रेणीचा फार मोठा प्रभाव आहे. 


ॲकन्काग्वा (७,०३५ मी.), 

पिस्सिस (६,८६२ मी.), 
वास्कारान (६,७६८ मी.), 
मेर्सेदार्यो (६,७७० मी.), 
सोराटा किंवा इयांपू (६,५५० मी.), 
साहामा (६,५२० मी.), 
ईयीमानी (६,४४७ मी.), 
चिंबोराझो (६,२७२ मी.), 
कोटोपाक्सी (५,८९६ मी.) ही अँडीजमधील काही उंच शिखरे आहेत. 

अँडीज हा दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यापासून १६० किमी. अंतरावर ४,५०० मी. उंच एकदम भिंतीसारखा अभा राहिलेला पर्वत आहे एवढेच नव्हे, तर समुद्राची खोलीही या किनाऱ्यापासून तेवढ्याच अंतरावर ६,००० मी. आहे. यावरून येथे मोठ्या प्रमाणात गटविभंग झाला असावा.

सामान्यत: वलीकरण व विभंग यांमुळे येथील रचना झालेली दिसते. तथापि जागृत ज्वालामुखींचा प्रभाव.
अँडीजची बरीच शिखरे हिमाच्छादित आहेत. विषुववृत्ताजवळही उंचीमुळे हिमाच्छादन आढळते. सर्वांत मोठ्या हिमनद्या दक्षिण चिलीत आढळतात. काही पॅसिफिकपर्यंत जातात. दक्षिण अँडीजमधील पुष्कळ हिमनद्यांनी खडकाळ किनाऱ्यावर खोल दऱ्या कोरलेल्या आहेत. या दऱ्या पाण्याखालीही खोल गेलेल्या आढळतात. त्यामुळे येथे नॉर्वेसारखा दंतुर किनारा आढळतो.

अँडीजमुळे पॅसिफिक दक्षिण अमेरिका व अटलांटिक दक्षिण अमेरिका असे दोन प्रादेशिक भाग पडतात एवढेच नव्हे, तर त्याच्यामुळे त्याच्या दोहो बाजूंच्या प्रदेशांच्या हवामानातही फरक पडतो.

दक्षिण चिलीत पश्चिम बाजूला जास्त पाऊस, तर पूर्वेकडे पँटागोनियाचा निमओसाड प्रदेश आहे. उत्तर चिली व पेरू येथे पश्चिम किनाऱ्यावर पर्जन्यहीन ओसाड प्रदेश आहे व पूर्वेकडे जंगलमय प्रदेश आहे. विषुववृत्तीय प्रदेश व दक्षिण चिली सोडले, तर अँडीजच्या पश्चिमेकडील भाग पूर्वेकडील भागापेक्षा कमी पावसाचा आहे.

 ॲमेझॉनचे मुख्य उगमप्रवाह व तिच्यासारख्याच मोठ्या उपनद्या अँडीजच्या पूर्व उतारावर उगम पावतात. ओरिनोको व पाराना यांनाही अँडीजमधून आलेल्या उपनद्यांचे पाणी मिळते. पॅसिफिकला मिळणारी एकही नाव घेण्याजोगी मोठी नदी नाही.

अँडीजमध्ये डायोराइट, अँडेसाइट व पॉर्फिरीझ हे खनिजयुक्त खडक आढळतात. अर्वाचीन ज्वालामुखीच्या भागात गंधक व बोरॅक्स मिळते. अँडीजमधील खाणींमुळे इंका लोकांनी ब्राँझ व तांबे यांची हत्यारे व सोन्याचांदीचे दागिने व धार्मिक विधींसाठी भांडी वगैरे बनविली. हल्ली सोने व चांदी यांपेक्षा तांबे व कथील यांचे उत्पादन अधिक आहे. पेरूमधील सेंट्रल टेल रोडच्या भोवतीचा प्रदेश, बोलिव्हियाचा पूर्वेकडील पर्वतविभाग व उत्तर चिलीतील नायट्रेट पट्ट्याच्या पूर्वेचा पश्चिम पर्वतविभाग हे प्रदेश खाणींसाठी प्रसिद्ध आहेत.

No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.