Thursday, 21 May 2020

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


जन्म :- २३ एप्रिल १८७३
मृत्यू :-२ जानेवारी १९४४
जन्मस्थान :- जमखिंडी, कर्नाटक
वडिलांचे नाव :- रामजीबाबा
आईचे नाव :- यमुनाबाई
पत्नीचे नाव :- रुक्मिणी 

शिक्षण :-
जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले.

श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले. 

१८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. 

एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. 

त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले.



मुंबई येथील प्रार्थनासमाजकोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली.

१९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.

भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला.

१९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.

 प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले.

१९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले.
१९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले.
१९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले.

जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.
१९०१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन, भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९०६ मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला

मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या.

१९१२ मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले.

महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून, श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी ‘अहल्याश्रम’ ही सोयीस्कर इमारत बांधली.

अस्पृश्यता निवारणकार्याचे १९२० पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले, तर विठठ्ल रामजी शिंदे हे ह्या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.

१९२३ साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनीधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इ. बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती.

 महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली.

देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली.

तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली.

१९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली.

पुणे येथे १९२८ साली भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले.

अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला.

बहिष्कृत भारत’ (१९०८),
‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२),
‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय.

अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा ‘कर्मवीर’ तसेच ‘महर्षी’ या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांचे पुणे येथे निधन झाले.




No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.