Friday, 22 May 2020

महर्षी धोंडो केशव कर्वे - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

महर्षी धोंडो केशव कर्वे


टोपणनाव: अण्णासाहेब
जन्म: १८ एप्रिल १८५८, शेरवली-मुरूड (कोकण)
मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२, हिंगणे आश्रम (पुणे)
चळवळ: स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा
पुरस्कार: भारतरत्‍न
प्रमुख स्मारके: हिंगणे पुणे
वडील: केशव बापूराव कर्वे
आई: लक्ष्मीबाई केशव कर्वे
पत्नी: राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे
अपत्ये: रघुनाथ ,भास्कर , दिनकर



रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. 
इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.

लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले.

इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते.

अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. 

 इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. 

इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले.

पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.

इ.स. १८९६ मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला.

या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. 

आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. 


स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. 

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' निर्माण झाली. तिचेच नाव पुढे '`महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' (थोडक्यात, कर्वे शिक्षण संस्था) असे झाले. 

१९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.

जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली.

पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे झाले.

अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.

कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.

मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले.

१९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला.

३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली.

धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.

आज २०२० सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर वसंत कानेटकर यांनी 'हिमालयाची सावली' नावाचे नाटक लिहिले आहे.



Thursday, 21 May 2020

सावित्रीबाई जोतीराव फुले - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

सावित्रीबाई जोतीराव फुले

टोपणनाव: ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
जन्म: ३ जानेवारी,  १८३१, नायगाव, सातारा, महाराष्ट्र
मृत्यू: मार्च १०,१८९७, पुणे, महाराष्ट्र
वडील: खंडोजी नेवसे (पाटील)
आई: सत्यवती नेवसे
पती: जोतीराव फुले

अपत्ये: यशवंत फुले
चळवळ: मुलींची पहिली शाळा सुरु करणे
संघटना: सत्यशोधक समाज
पुरस्कार: क्रांतीज्योती
प्रमुख स्मारके: जन्मभूमी नायगाव
धर्म: हिंदू




सावित्रीबाई जोतीराव फुले  ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.

महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.

विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.

इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते.

सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा.

पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.

साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.

मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे.

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली.

या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले.

सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाही

बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.

सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.

आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला.

काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला.

 यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.

 त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.

सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


जन्म :- २३ एप्रिल १८७३
मृत्यू :-२ जानेवारी १९४४
जन्मस्थान :- जमखिंडी, कर्नाटक
वडिलांचे नाव :- रामजीबाबा
आईचे नाव :- यमुनाबाई
पत्नीचे नाव :- रुक्मिणी 

शिक्षण :-
जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले.

श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले. 

१८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. 

एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. 

त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले.



मुंबई येथील प्रार्थनासमाजकोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली.

१९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.

भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला.

१९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.

 प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले.

१९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले.
१९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले.
१९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले.

जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.
१९०१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन, भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९०६ मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला

मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या.

१९१२ मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले.

महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून, श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी ‘अहल्याश्रम’ ही सोयीस्कर इमारत बांधली.

अस्पृश्यता निवारणकार्याचे १९२० पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले, तर विठठ्ल रामजी शिंदे हे ह्या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.

१९२३ साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनीधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इ. बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती.

 महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली.

देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली.

तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली.

१९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली.

पुणे येथे १९२८ साली भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले.

अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला.

बहिष्कृत भारत’ (१९०८),
‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२),
‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय.

अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा ‘कर्मवीर’ तसेच ‘महर्षी’ या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांचे पुणे येथे निधन झाले.




लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जन्म: २३ जुलै ,१८५६ रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत

मृत्यू: १ ऑगस्ट १९२०, पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: सत्यभामाबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक

तळटिपा: "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच."
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी मराठा
प्रमुख स्मारके: मुंबई, दिल्ली, पुणे
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर

टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.

गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.

टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली.

 पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.
                                पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.

इ.स. १८७२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

कुस्ती, पोहणे व नौकाचालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली.

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांना अनेक मान्यवंत शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्‌स्वर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रुची वाढवली तर गणित शिकवणाऱ्या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली.

कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते.



 इ.स. १८७७ मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एल.एल.बी. करण्याचे ठरवले.

त्यांची गणितातील रुची आणि संशोधनाची आवड पाहता एल.एल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, " ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतीत होईल."

 इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का? असा त्यांचा सवाल होता.

 इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली.

उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला.

 रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे.

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले.

आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले.

 या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’ या विषयावर झाला होता.जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते.

टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही ’.

त्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते.

निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले.

१ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला.

विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.

इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्‍यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले.

आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले.

तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते.

इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.

८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.

मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.

चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरीमराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठा चे संपादक होते.

सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच.

पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता.

१८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले.

 ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ',
 ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,'
 ' टिळक सुटले पुढे काय ', 
' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ',
 ' टोणग्याचे आचळ ',
 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, 
' बादशहाब्राह्मण झाले '

 हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते.

 त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत.

आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे.

 त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे.

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. 

हि घोषणा केली होती.

इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि ई.स १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. त्यांत मिरवणूक हा मोठा भाग होता.




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

जन्म :-३१ मे, १७२५, जामखेड, अहमदनगर 
मृत्यू :- १३ ऑगस्ट १७९५, इंदोर
पूर्ण नाव :- महाराणी अहिल्याबाई होळकर
पतीचे नाव :- खंडेराव होळकर (१७३३-१७५४)
घराणे :- मराठा राजघराणे , होळकर
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स.१७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला.
बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.


मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही.

१२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली.

भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे - काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे.

अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे.

अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ, इंदूर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला.

कारागरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.

या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टतेची प्रचीती आपणास यते.


अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात.

अहिल्यादेवींच्या काळातील किल्ले व भुईकोट :

किल्ले महेश्वर
इंदोरचा राजवाडा
चांदवडचा रंगमहाल
वाफगाव - यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ
खडकी-पिंपळगाव : होळकर वाडा
काठापूर : होळकर वाडा किंवा वाघ वाडा

अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे, बारव व धर्मशाळा :

अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
वीरगाव : बारव
अंबा गाव – दिवे.
अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट, विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व एक कुंड.
इंदूर – अनेक मंदिरे व घाट
ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
कर्मनाशिनी नदी – पूल
काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर (महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.
गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णूचे व रेणुकेचे मंदिर.
चिखलदा – अन्नछत्र
चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव (महाराष्ट्र) - राम मंदिर
जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
जामघाट – भूमिद्वार
जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
द्वारका (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
नैम्बार (मप्र) – मंदिर
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
पंढरपूर (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप, धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली. बाजीराव विहीर
पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव [८]
पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
पुणतांबे (महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
पुणे (महाराष्ट्र) – घाट (कोणता घाट?)
पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
बिठ्ठूर – ब्रह्मघाट
बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मनसा – सात मंदिरे.
महेश्वर - शंभरावर मंदिरे, घाट, धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान व श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
वाफगाव(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
श्री विघ्नेश्वर – दिवे
वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
वेरूळ (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.
श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.
सप्‍तशृंगी – धर्मशाळा.
संभल? (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
साखरगाव (महाराष्ट्र)– विहीर.
सिंहपूर – शिव मंदिर व घाट
सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
नंदुरबार (महाराष्ट्र)- विहीर

अहिल्यादेवीचे नाव असलेल्या संस्था

अहिल्यादेवी हायस्कूल, पुणे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर


एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.

इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.

(इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.

मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले





राजर्षी शाहू महाराज - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

राजर्षी शाहू महाराज

जन्म:  २६ जून १८७४, लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर
मृत्यू :-६ मे १९२२ , मुंबई
पूर्वाधिकारी :-  छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)' राजाराम ३
उत्तराधिकारी :- छत्रपती राजाराम भोसले
वडील :- आबासाहेब घाटगे
आई :-राधाबाई
पत्नी :- महाराणी लक्ष्मीबाई भोसले
अधिकारकाळ :- इ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहण :- एप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्ती :- कोल्हापूर जिल्हा
राजधानी :- कोल्हापूर
पूर्ण नाव :-  छत्रपती शाहू महाराज भोसले
राजघराणे :- भोसले
राजब्रीदवाक्य :- जय भवानी

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात.

 कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.

त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते.

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. 

सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. 
शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.

२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.



राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. 

जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. 

इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. 

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. 

१८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले.

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’,
 शाहुपुरी व्यापारपेठ,
 शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी 
‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ 

इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. 

त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

 शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. 

रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे

महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. 

तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. 

त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. 

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. 

शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या.

 शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 

१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. 

बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.

त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. 

जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली.

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

 वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली.

बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. 

पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे.

दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंांं होते.

बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. 

यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.

शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते.

डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या.

१. प्राथमिक शाळा 
२. माध्यमिक शाळा 
३. पुरोहित शाळा 
४. युवराज/ सरदार शाळा 
५. पाटील शाळा 
६. उद्योग शाळा 
७. संस्कृत शाळा 
८. सत्यशोधक शाळा 
९. सैनिक शाळा 
१०. बालवीर शाळा 
११. डोंबारी मुलांची शाळा 
१२. कला शाळा

शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.

१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) 
२. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) 
३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) 
४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) 
५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) 
६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
 ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) 
८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
१०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) 
११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) 
१२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८)
१३. वैश्य बोर्डिंग (१९१८)
१४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९)
१५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०)
१६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०)
१७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१)
१८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१)
१९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०)
२०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०)
२१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०)
२२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०)
२३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०)
२४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९)
२५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०)
२६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)



 




गोपाळ हरी देशमुख - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

गोपाळ हरी देशमुख


जन्म : १८ फेब्रुवारी ,१८२३
मृत्यू :- ९ ऑक्टोबर ,१८९२.
जन्मस्थान :- पुणे
टोपणनाव :- लोकहितवादी , रावबहाद्दूर
वडिलांचे नाव :- हरिपंत देशमुख

गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते.

गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.



इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले.

’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२ पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.

लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही.लोकांनी ज्ञानी व्हाव आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात.इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादीना वाटायचे.

श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली.

हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे.

रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२ मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले.

पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८ मध्ये झाले.

इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२ मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’.

याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.

इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात.

 या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.

 धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाशइंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला.

लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले.

लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ.

लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.

मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे.

मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्‍री ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली.

सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता.

इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले.
इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले.

गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी ऊर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले.

अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना, हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य, गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना, गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन, गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत,
पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग इत्यादी त्यांचे समाजकार्य उल्लेखनीय आहे.

ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७ मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.

१८८१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.


गोपाळ गणेश आगरकर - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

गोपाळ गणेश आगरकर


जन्म :- 14 जुलै 1856 
मृत्यू :- 17 जून 1895
जन्मस्थान :- टेंभू, तालुका -कराड , जि -सातारा
पत्रकारिता/ लेखन: केसरी, सुधारक
धर्म: हिंदू
वडील: गणेश आगरकर
पत्नी: यशोदाबाई गोपाळ आगरकर
अपत्ये: यशवंत , माधव, व २ मुली

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.



शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले.

१८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९ मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली.

दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले.

आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली.

केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली.

 आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली.

१८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले.

राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते.

समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले.

सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.

आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील.

संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली.
 कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे.

गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स.१९३४ साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो.

 इ.स. २०१० मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२ साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.

महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते. २०१२साली हा पुरस्कार महेश म्हात्रे यांना मिळाला होता.




नामदार गोपाळ कृष्ण गोखले - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले

जन्म:- मे ९, १८६६
जन्मस्थान :-कोतळूक, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू:- फेब्रुवारी १९, १९१५ , पुणे , महाराष्ट्र
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा
संघटना: भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
वडील: कृष्ण महादेव गोखले

आई: सत्यभामाबाई कृष्ण गोखले


बालपण

रत्‍नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या पत्‍नीने स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे गोपाळ कृष्ण गोखल्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले



शिक्षण

१८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी १८८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. 

पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, 
१८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. 

सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. 

राजकीय प्रवास

बाळ गंगाधर टिळक आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.

इ.स. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारा गोपाळ कृष्ण गोखले यांना  १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.

त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.

इ.स. १८८९ मध्ये कॉंग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. 

१९०५ सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 

कॉंग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले. 

भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Societyची) स्थापना केली. 

मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.

न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. 

गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत.

गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.
गोपाळ कृष्ण गोखले यांचे 'अंकगणित' हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात असे

संस्था :- 

नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स ॲन्ड इकाॅनाॅमिक्स' नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.



पंडिता रमाबाई - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

पंडिता रमाबाई - महाराष्ट्रातील समाजसुधारक 

जन्म :- २३ एप्रिल १८५८ 
मृत्यू :- ५ एप्रिल, १९२२
टोपणनाव:- पंडिता रमाबाई सरस्वती 
वडिलांचे नाव :- अनंतशास्त्री डोंगरे
आईचे नाव :- लक्ष्मीबाई डोंगरे
जन्मस्थळ :- गंगामूळ (कर्नाटक)

इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते.

पंडिता रमाबाई सरस्वती




 बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. 

आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले.

१८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले.

भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले


१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या.

हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या.

परिणामत: २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.


११ मार्च, १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली.

इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदनपुण्यात आणले गेले.

२४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली.

इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत.



महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.

त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.

अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले.

कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते.

पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले.

 स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्र

खर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.


कर्मवीर भाऊराव पाटील - महाराष्ट्रातील समाजसुधारक

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.



कर्मवीर भाऊराव पाटील


जन्म :- २२ सप्टेंबर १८८७, कुंभोज
मृत्यू :- ८ मे १९५९, पुणे
पूर्ण नाव :- कर्मवीर भाऊराव पाटील
वडिलांचे नाव :- पायगोंडा देवगोंडा पाटील
सन्मान :- पदमभूषण
संस्था :- रयत शिक्षण संस्था 

सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले.

ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.

अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले.

 पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.

१९३२ मध्ये महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पूणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग' ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. 

पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.



शिक्षण संस्था


दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -

  1. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
  2. मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
  3. निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
  4. अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
  5. संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
  6. सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
  7. बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले.

२५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. 

जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. 

बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.

त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली.

इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली.

शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. 

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.

रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक, २७ प्राथमिक, ४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय, २ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.

ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे.

सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.